Monday 4 May 2020



*मनामनाच्या मनामनातील माणुसकीच्या भिंती!!!!!!!!*
     

                         *खरं तर व्हाट्सएप व फेसबुकची भिंत (whatsapp , facebook Wall) या टाळा बंदीच्या काळामध्ये खूप काही शिकवत आहे. अगदी एक प्रकारची गुरुची भूमिका निभावताना दिसतेय. अगदी अन्न, पाणी, हवा यासारखी जीवनावश्यक गोष्ट बनली आहे.पण होतय कसं, कधी संदेशाची एवढी जत्रा भरलेली असते की काय बोलायची सोयच राहत नाही. जत्रेत एखादे लहान मूल हरवून जाते, व घाबरून जातं.. तशीच या मोहजालात मनाची अवस्था होऊन जाते. काही दिवसांपूर्वी या भिंतीमुळे "माणुसकीची भिंत" जी कोणत्या तरी दूर देशी उभी राहिली होती, तिच्यापासून बोध घेत खेडोपाडी, लहान मोठया शहरांमध्ये माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या होत्या. जुने वापरलेले कपडे, जुन्या वस्तू या भिंतींनी गरजू लोकांना पुरवल्या.काही का होईना पण या निर्जीव भिंतींना माणुसकीचा ओलावा स्पर्श करून गेला होता. या भिंतीमुळे माणसालाही आपल्याकडे काय जास्त आहे हे कळले व जास्तीचे दुसऱ्यांना देण्याची जाणीव निर्माण झाली त्यातून गरीब व गरजवंत लोकांना लाखमोलाची मदत मिळाली. खरच अशा* *माणुसकीच्या भिंती  व्हाट्सएप व फेसबुक च्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी उभ्या करण्याचा उत्तम प्रयत्न बऱ्याच ठिकाणी झाला.*
*मागे काही महिन्यांपूर्वी जावली तालुक्यामध्ये  या भिंतीचा खूप चांगला सामाजिक वापर होताना आपण सगळ्यांनी पाहिल. एक शाळकरी मुलगा आजारी पडतो, दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा अवाढव्य खर्च. त्या गरीब कुटुंबाला न परवडणारा.मग त्याच शाळेतील शिक्षक "एकाचे लाख नकोत पण लाखोंचा एक एक रुपया हवा"याप्रमाणे याच भिंतीवर भावनिक संदेश टाकतात. आणि लाखों कडून थोडी थोडी मदत जमा होते ,समाजातील सर्वच घटकातून मदतीचा ओघ सुरु होतो व त्या कोवळ्या शाळकरी मुलाचा जीव वाचतो. किती मोठी ताकत आहे या भिंतीमध्ये..... कारण मदत देताना अहं भाव नाही की मदत स्वीकारनाऱ्याचा ओशाळलेला चेहरा नाही. कारण या हाताचे दुसऱ्या हाताला कळण्याचा मार्गच नाही. कारण सर्वांनी दिलेल्या अकाउंटला ऑनलाइन पैसे भरले होते.अशाप्रकारे रक्ताच्या नात्यांबरोबरच माणुसकीची नाती या निर्जीव भिंतीमधून तयार होण्यास मोठी मदतच होते. अशा कितीतरी सामाजिक बांधीलकीतुन विविध गोष्टी होताना आपण सारे पाहत असतो, आपापल्या परीने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आपण करत असतो. यात या भिंतीचे अस्तित्व कामी येत आहे हे वेगळे सांगायला नको.*
*साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वी मधल्या काळात माणसाला व्यक्त होण्यासाठी काहीच माध्यम उरले नव्हते ,बरेचजण आपल्या आपल्यातच घुटमळत होते, एक तर चार भिंतीच्या आतमध्ये किंवा अगदीच वेळ मिळाला तर गल्लीमध्ये. तशी माणस या ठिकाणी दिल्ली पर्यंतच्या बाता करायची पण ऐकणाऱ्यांची मर्यादा असायची. पण या भिंतीमुळे किती छान झाले आहे बघा.... गल्ली राहुद्या, दिल्ली जाऊद्या त्याने आख्खी जागतिक बाजारपेठच कवेत घेतलेयना.कोणत्याही राष्ट्रीय, जागतिक धोरणांवर माणसाला मुक्त आपले विचार मांडता येत आहेत. पण काहीवेळा अतिरेक होतानाही आपण पाहतोय...सकाळ संध्याकाळ, सुट्टीच्या दिवशी, झोप येत नसेल तर, कधी कधी रात्री अपरात्री जाग आल्यानंतर,अगदी कामाच्या ठिकाणी तंबाखूची तलफ आल्यागत त्याची अवस्था झाली आहे. थोडा जरी वेळ मिळाला तरी या भिंती वाचण्यासाठी त्याचे मन अधीर होते. अगदी समोर कामाचा फार मोठा व्याप असेल तरी त्याला दूर सारता येत नाही. एकवेळ जेवण पाणी वेळेवर नाही मिळाले तरी चालेल पण आपल्या पोस्टला लाईक किती मिळाल्या हे पाहण्यातच तो मश्गुल असतो. समजा त्यावेळी नेटवर्क मुळे काही समस्या निर्माण झालीच तर तो अगदी वेडापिसा होतो. व त्या भिंतींच्या दर्शनासाठी त्याची नेटवर्क शोधण्यासाठी धडपड सुरू होते, व सापडल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडतो. कधी कधी येतो चार्जिंगचा प्रॉब्लेम... त्यावरही आता पावर बँकचा इलाज शोधून काढलाय ना....  हे झाले मोठ्यांचे, मग लहान मंडळी काय मागे राहतील.त्यांनीही त्यांच्या भिंती सजवायला नाटवायला अगदी आठव्या नवव्या वर्षापासून सुरुवात केली तर कसले आश्चर्य?? मग सुरुवात होते तोंड वेडेवाकडे करून स्वतःला वेगळे सिद्ध करण्याची स्पर्धा???घरातील मोठी मंडळीही अगदी चारचौघात ........"मला यातले काही कळत नाही पण माझ्या मुलाला सर्व काही माहीत आहे......अगदी बरोबर शोधून काढतय "अस म्हणून प्रोत्साहनच देत असतात.पहिले मुलांचे खेळही सिझनेबल असायचे तसं आता मोबाईलवरही सुरू झालय. एक संपला की दुसरा .पब्जीन अगदी सब्जी झालेय मुलांच्या डोक्याची,,,  पब्जी झालं की हॅलो, हॅलो झाल की टिक टॉक आता यापुढील कंपन्यांनी तयार केले असेलच. खूप तरलता ठेवली आहे ती ही अगदी विचारपूर्वक . लहान मुलेही मग भिंतींवर आपला गेमचा स्कोर ठेवतात स्टेटसला .म्हणजे तोही स्टेटस ठेवणे आता स्टेटसचा भाग झालाय असच मलातरी वाटतय..... दुसरे असे की या भिंती वाचता वाचता माणसाचा वाचनाचा दृष्टिक्षेपही खूप वाढलाय एवढ मात्र नक्की. पूर्वी समाजामध्ये ठराविक मोजकेच लोक वाचन करत होते त्यातील खूप कमी वाचनालयात मासिक वर्गणीदार होऊन वाचणारे.. पण सध्याच्या घडीला या भिंतीच्या माध्यमातून वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे.मनाला प्रेरणा देणारे, कुठेतरी मनाला भावणारे, तर काही वेळा मनाला अधिक संवेदनशील बनवणारे सुंदर लेख वाचायला मिळतात. एखाद भलंमोठं पुस्तक वाचन करून त्यातील वेचक वेधक, काहीतरी चिंतन करायला लावणार अगदी सारांश लेखनासारखं वाचण्याची संधी आपल्याला उपलब्ध होत आहे. काहीजण त्यातून आपली स्वतःची सुंदर शब्दफुलें गुंफत असतात तर काही जण काव्यफुलें ओंजळीने उधळत असतात. कधी कधी समाज प्रबोधन करणार लिखाण तर कधीकधी कस जगायचं कस वागायचं याचा विचार करायला लावणारे लेख आपल्याला या भिंतींवर कोरलेले पाहायला मिळतात.*
*कधी कधी गर्दी होते भिंतीवर ..........पण आपणच शोध घ्यायचा असतो त्यातील चांगुलपणाचा ......शोध घ्यायचा असतो दर्दी बनून नाविन्याचा..... आपणच राजहंस व्हायचे चांगले काय आणि वाईट काय शोधण्यासाठी.....  . नाहीतर काही माथेफिरू असतात टपलेले समाजमन भडकवयला..........  ते ही फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी...    कधी कधी तर खूप वाईट वाटते, जी माणसे व्हाट्सएप किंवा फेसबुकवर आपल्या शब्दफुग्यांनी भिंती नटवतात,त्यामध्ये वेगवेगळे  शाब्दिक रंग भरतात. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र त्यांचे बरेचदा रंग उडलेलेच जाणवतात. शब्दांमधले त्यांचे सामर्थ्य फिके पडल्याचं जाणवत बरोबर ना??? त्यांच्याशी नक्की कसं वागायचं हे त्यावेळी समोरच्याला वळत नाही. "दुरून डोंगर साजरे "म्हणायची वेळ येते आपल्यावर.... कधी कधी वाढदिनी, यश संपादन केल्यावर या सामाजिक भिंतीवर शुभेच्छांची गर्दी होते पण ,पण प्रत्यक्ष त्याच दिवशी भेटल्यावर शुभेच्छा देण्यासाठी हात समोर येत नाही.... किती दुर्दैव......?? या शुभेच्छा या भिंतीवर इतक्या गर्दी करतात त्यांचा एवढा अतिरेक होताना दिसतो की जसे अनेक रंग आल्यावर जसा बेरंग होऊन जातो तशीच या भिंतींची अवस्था होऊन जातो. तुफान पावसाने महापूर यावा अशी अवस्था होऊन जाते .......अती पावसाच्या पाण्याने चिखलच होतो ,मग निवळायलाही खूप वेळ लागतो......तसच त्यां भिंतींना पुन्हा शुभ्र करण्यासाठी क्लिअर ऑल शिवाय पर्याय राहत नाही आपल्याकडे. मग अशावेळी नाजूक कळी चुकून आपल्याकडून खुडली जाते ,तसे काही चांगलेही क्लिअर ऑल होऊन जाते अशावेळी घाईत........ मग आपलीच मनात चिडचिड होऊन जाते.आणखी असा प्रश्न पडतो की वाढदिवसालाही तीच फुल आणि श्रद्धांजली वाहतानाही तीच फुल.... आणि योगायोगाने अस काही एकाच दिवशी घडल की मनाचा गोंधळच उडतो. नक्की शुभेच्छा दयाव्या का श्रद्धांजली  दयावी......पण याच भिंतींमुळे अनेक दिवस झालेली ताटातूट पुन्हा एकदा फुलते..........., मित्रत्वाचीही पुन्हा एकदा झुलते......... त्यावेळी मात्र आपल्या साऱ्यांचे मनही खुलते........ आणि पुन्हा एकदा मुहूर्त साधला जातो गेट टुगेदरचा .......आणि हे शक्य होतय केवळ आणि केवळ या अलौकिक भिंतीमुळच होय ना......? अनोखी भिंत म्हणावी लागेल ना हिला....??सगळ्यांच्या भावना अलगद  स्वीकारताना तिचा जीव मात्र घुटमळत नसेल ना..???जस आपलं होत कधीतरी तसं......पाहिजे त्यावेळी पाहिजे असणारा मेसेज सापडत नाही तेंव्हा.... जशा आपल्या घराच्या भिंती असतात चार इंची, सहा इंची, नऊ इंची तशा हिच्याही भिंती विविध समूहाच्या माध्यमातून बनलेल्या असतात काहींच्या आठ जीबी, काहींच्या सोळा जीबी, काहींच्या चौसष्ठ जीबी...... सिमेंटप्रमाणे हे समूह  प्रमुख समाजातील विविध घटकांना  सांधण्याचे काम करत असतात. भिंतींचे प्लास्टर जेवढे आकर्षक तेवढ्या इमारती आकर्षक ....त्याप्रमाणे तुमचे समूह जेवढे चांगले तेवढया तुमच्या याही भिंती आकर्षक... नाहीतर मग सारखी दुरुस्ती आलीच कॉपी पेस्ट डिलीट करण्याची....त्यासाठी जेवढे तुमचे समूह किंवा गट उत्तम तेवढे तुमचे आचार विचार उत्तम.... असे म्हणण्याची वेळ आली आहे. भिंतीतर आता आपोआप बांधल्या जात आहेत, आता गरज आहे त्यावर रुफिंग करण्याची ....समजलात ना....?म्हणजे सुंदर सुविचार केवळ वाचायचे नसतात तर ते प्रत्यक्ष आचरणात ही आणायचे असतात. उत्तम विचार आपल्या शरीरात भिनवायचे असतात, आणि आपणच आपल्याला नटवून पहायच असत समाजमाध्यमरूपी आरशात........... संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंती चालवल्या होत्या त्या काळात....त्यांच्या अलौकिक सामर्थ्याने.... ... आपण सारे ही आपल्या भिंती चालवतोय तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने... आजच्या धकाधकीच्या जीवनात आपणही भिंती चालवताना काळजी घेतली पाहिजे....मानामनातल्या अविश्वासाच्या..... द्वेषाच्या.... स्वार्थाच्या भिंती दूर सारून .....या भिंती एवढ्या पारदर्शक झाल्या पाहिजेत की या भिंतीमधूनही पलीकडचे सहज दिसेल.. व्हाट्सएप ,फेसबुकच्या भिंती बरोबरच विविध भिंती अस्तित्वात आहेत, या ठिकाणी कंटाळून काहीजण ट्वीटर , लिंक इन यांसारख्या ठिकाणीही घरोबा करत आहेत......साऱ्यांचा एकमेकांनी शोध नक्की घेतला पाहिजे.... अधिक सक्षम होण्यासाठी ........नाविन्याचा ध्यास धरला पाहिजे.... समाजाने समाजाच्या विधायक कामासाठी समाज माध्यमांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे.... समाज माध्यमाच्या भिंतींवर तिचे गुणदोष मांडताना अवघडल्या सारखं वाटतंय... पण ती त्यांच्यासाठीच आहेत ना........ ????.मुक्त व्यक्त होण्यासाठी.....????*

*✒️✒️✒️✒️✒️©विष्णू ढेबे. महाबळेश्वर*
📞 -7588686065

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...