बोधकथा

मुर्खाशी गाठ

एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे''

     बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जाण्‍यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्‍यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्‍हणाला,'' बादशहा तुम्‍हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्‍यावर तो तुम्‍हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्‍न विचारेल पण काही केल्‍या तुम्‍ही तोंड उघडू नका. एकही शब्‍द न बोलता गप्‍प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्‍ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.
   
     बिरबलाचे वडील बादशहाच्‍या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्‍यांना सलाम केला. बादशहाने त्‍यांना बिरबलाचे वडील म्‍हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्‍हणून त्‍याने विचारले,'' तुम्‍हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्‍पच. त्‍याने पुन्‍हा विचारले,'' तुम्‍ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्‍न विचारले तरी बिरबलाने सांगितल्‍याप्रमाणे वडील गप्‍पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्‍या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्‍या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्‍या प्रश्‍नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्‍द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्‍यांनी हा प्रकार बिरबलाच्‍या कानावर घातला. बिरबलाने त्‍यांची समजूत घातली व शांत राहाण्‍यास सांगितले. चार दिवसांनी जेव्‍हा बिरबल पुन्‍हा दरबारात गेला तेव्‍हा बादशहा बिरबलाला म्‍हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्‍वाचे बोलायचे आहे तेव्‍हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्‍याला म्‍हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्‍काळ उत्तरला,''महाराज आपण शांत रा‍हिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्‍हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्‍हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्‍यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्‍यासारखे झाले.

तात्‍पर्य :- मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा.







गाणारा पोपट

एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटा कडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही  सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.

     एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ...समजल  ! ".

     सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही  होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लाप्तून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.

     सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेल असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला



 चांगल्‍या कामाचे फळ मिळतेच

उज्‍जैनचा राजा विक्रमादित्‍य गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्‍यास सदैव तयार असे. या प्रजादक्ष राजाचे सर्वत्र कौतुक केले जात असे. राजाची स्‍तुती शनि महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली व त्‍यांनी राजाची परीक्षा घेण्‍याचे ठरविले. शनिने महाराजांनी विक्रमादित्‍यास सांगितले,'' राजा मी कोण आहे हे तुला माहिती आहे का,'' राजा म्‍हणाला,'' मी तुझी ओळख ठेवून काय करणार, तुझेच काही काम असेल तर मला सांग, मी जीवाची बाजी लावण्‍यासही मागे-पुढे पाहणार नाही.''
शनि महाराजांना या राजाचा बोलण्‍यातून स्‍वत:चा अपमान वाटला व त्‍यांनी त्‍याला सुनावले की राजा तुला तुझ्या सत्तेचा, पराक्रमाचा गर्व चढला आहे. मी जेव्‍हा तुला सळो की पळो करून सोडेन, तेव्‍हा तूच मला ओळखू लागशील.'' यानंतर शनि महाराजांचा कोप झाल्‍याने विक्रमादित्‍याने स्‍वत:चे राज्‍य गमावले, त्‍याच्‍यावर जंगलात जाऊन एकांतवासात राहण्‍याची वेळ आली. शनिमहाराजांनी आता जंगलात जाऊन पाहिले तर त्‍यांना विक्रमादित्‍य जंगलातही मजेत राहत होता. राज्‍यकारभाराच्‍या ताणतणावातून मुक्त झाल्‍याने त्‍याला लोकांना मदत करण्‍यासाठी अजूनच जास्‍त वेळ मिळत होता. ते पाहून शनिदेवाने एका डाकूचे रूप घेतले आणि राजासमोर जाऊन युद्धाचे आव्‍हान दिले. यात राजाचा पराभव होऊन डाकूच्‍या वेशात असलेल्‍या शनिदेवांनी राजाचे हातपाय तोडले. अशा अपंग असलेल्‍या राजाची ही अवस्‍था पाहून एका तेल्‍याला त्‍याची दया आली व तो राजाला घरी घेऊन गेला. त्‍याची सेवा केली. राजा तेल्‍याला म्‍हणाला,''बाबा, तुम्‍ही माझ्यासाठी इतके केले, तुमच्‍या तेलाच्‍या घाण्‍यावर जर मला बसवले तर मी बैलांवर लक्ष ठेवेन. तुमचे तेवढेच काम हलके करण्‍याचा प्रयत्‍न करेन. तेल्‍याच्‍या या कामातही राजाने आपली मदत करण्‍याची वृत्ती सोडली नाही हे पाहून शनिदेव प्रसन्‍न झाले. राजाचे सर्वस्‍व हिरावूनही तो लोकांना मदत करण्‍याचा वसा सोडत नाही हे पाहून शनिदेवाने राजाला पूर्ववत करून त्‍याचे सगळे साम्राज्‍य त्‍याला परत केले.

तात्‍पर्य :- चांगल्‍या कामाचे फळ हे लगेच जरी मिळत नसले ते निश्चित मिळते. काही कष्‍ट सोसल्‍याशिवाय दगडालासुद्धा देवपण येत नाही. चांगले काम करताना निंदानालस्‍ती, टीका, उपहास जरी सहन करावा लागला तरी आपण सदवर्तन करत राहावे यातूनच आपला उत्‍कर्ष होतो. मानवी जीवनात आपण कुणाचे तरी चांगले करून जावे.





 जगाला सुधारू शकत नसल्याने स्वतःला सुधारणे आवश्यक !

एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला.

तात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.




गरुड आणि घुबड

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’

    पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.





घोडा आणि रानडुक्कर

एक तहानलेला घोडा एका ओढयावर पाणी पिण्यास गेला असता, एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोडयास पाणी पिऊ देईना, त्यामुळे त्या दोघांचे भांडण जुंपले. रानडुक्कराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोडयाने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंत मान्य करून हाती शस्त्रे घेतली व त्या घोडयावर बसून तो डुकरास शासन करण्यास निघाला.
ओढयाजवळ गेल्यावर त्याने एक तीर सोडून त्या डुकराचा तात्काळ प्राण घेतला.

      आपल्या शत्रूचे आपल्या देखत पारिपत्य झालेले पाहून घोडयास मोठा आनंद झाला, त्याने त्या माणसाचे फार आभार मानले व ‘मला आता घरी जाण्यास आज्ञा असावी’ असे तो म्हणाला. परंतु माणसाने त्यास जाऊ दिले नाही. तो म्हणाला, ‘तुझा मला पुष्कळ उपयोग होईल असे वाटते व म्हणूनच मी तुला माझ्या तबेल्यात नेऊन बांधणार.’ हे ऐकताच, क्षुल्लक गोष्टीसाठी आपले स्वातंत्र्य कायमचे गमाविल्याबद्दल घोडयास फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य :- दुसर्‍याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो, तेव्हा ती गुलामगिरी कायमचीच आपल्या गळ्यात पडेल की काय याचा चांगला विचार केला पाहिजे.





शेळी आणि कावळा

एकदा एक कावळा एका गरीब शेळीच्या पाठीवर बसून तिच्यावर चोची मारू लागला. तेव्हा शेळी त्याला म्हाणाली, ‘अरे, तू माझ्यासारख्या गरीबाला टोचतोस त्यापेक्षा जर कुत्र्याला टोचशील तर तू खरा.’
त्यावर कावळा म्हणाला, ‘कुणालाही त्रास देण्यापूर्वी मी त्याच्याकडून आपल्याला त्रास होणार नाही ना असा विचार करतो. जे शक्तिवान आहेत त्यांच्या वाटेला मी कधीच जात नाही, पण जे दुबळे आहेत त्यांना मात्र मी भरपूर त्रास देतो.’

तात्पर्य :- जो मनुष्य इतरांना त्रास देतो तो कुणालातरी भीतच असतो.




पोपट आणि चिमणी

एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे.
तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्‍या कोणास क्वचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसर्‍या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे, ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’

तात्पर्य :- कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.






गाढव आणि त्याचा निर्दय धनी

एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.





     जशी दृष्टी तशी सृष्टी

भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी युध्दिष्ठराला बोलावून सांगितले, "या यज्ञात आपल्याला एका माणसाचा बळी द्यावयाचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देऊ. त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, "मी एक यज्ञ करू घातला आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध, आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' युध्दिष्ठिर एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी निघाला. युध्दिष्ठराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे परत आला व म्हणाला, "भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही आणि आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ तरी पार पडेल. थोड्या वेळाने दुर्योधन आला व कृष्णाला म्हणाला, "देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा देवा, एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.

तात्पर्य :- जशी दृष्टी असेल तसे आपल्याला जग दिसणार आहे.
   



एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही
त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच
तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.

तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.

संकलन
साभार
*श्री.बाळकृष्ण जगताप*
*8482957145*
sojagtap@rediffmail.com

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...