Tuesday 14 March 2023

पर्यावरण पूरक रंगपंचमी

चिखली शाळेत नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, तालुका महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची निर्मिती करून पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात साजरी केली. रंगपंचमीचा सण हा आबालवृद्ध यांच्या आवडीचा असतो, कृत्रिम व रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले रंग हे त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यातून विविध त्वचा विकार, तसेच ऍलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. तसेच पाण्याचा अपव्यय यातून पर्यावरण हानी मोठ्या प्रमाणात होत असते. बालपणापासून पर्यावरण विषयक दृष्टिकोन रुजावा यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.विअर्थ इसेनशिअल्सच्या स्वप्नील बोधे व सोनिया बोधे तसेच वांगो ग्रीनचे वैदेही नायर व आदित्य नायर यांच्या माध्यमातून नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा सकाळच्या सत्रात घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना निसर्गात विविध रंगांच्या वस्तू गोळा करण्यासाठी सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी जास्वंद, मोगरा, शंभुकेस यांसारखी फुले ,टोमॅटो स्ट्राबेरी, पालक भाजी, विविध झाडांची पाने, बीट, हळद, चुना, तांदळाचे पीठ, माती, विविध रंगांची माती, लिंबू, सुगंधासाठी गुलाब पाणी यांसारख्या निसर्गात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून सोळा प्रकारच्या विविध रंगछटा तयार करून घेण्यात आल्या. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रंगाची उधळण करून रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली. रंगपंचमीच्या विविध गाण्यांवर ठेका धरत उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.नैसर्गिक रंगांमुळे मुलांना कोणताही त्रास जाणवला नाही. तसेच पाण्याचा अगदी कमीतकमी वापर करून रंगपंचमी खेळल्यामुळे पाण्याचा अपव्ययही टाळला गेला. यापुढेही अशीच पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. यावेळी गावातील आबालवृद्धही या उपक्रमात सहभागी झाले होते.शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे तसेच उपशिक्षक महेश पवार यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.दाभे शाळेचे सचिन कुंभार सर तसेच जावली शाळेचे संतोष चोरगे सर, ओमकार जाधव, सागर जाधव सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे कोंडीबा जाधव व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...