Tuesday 21 April 2020

📕📗📘📙📒📔📗📕
         *पुस्तक परिचय*
*पुस्तकाचे नाव- चीपर बाय दी डझन*
लेखक- फ्रँक गिलब्रेथ(ज्युनियर) व अर्ने स्टाईन कॅरे
अनुवाद - मंगला निगुडकर
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या- १४४
किंमत- १०० रुपये
📓📔📒📙📘📗📕📒

          *चीपर बाय दी डझन हे पुस्तक फ्रॅंक गिलब्रेथ व अर्ने स्टाईन या एका मुलाने व मुलीने मिळून लिहिलेले आपल्या वडिलांचे चरित्रवजा पुस्तक असले तरी मनोवेधक व मनोरंजक आहे ,जे पूर्ण केल्याशिवाय आपण खाली ठेवत नाही. आपल्या वडिलांच्या लहानपणीच्या आठवणी मुलांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत .फ्रँक गिलबर्ट हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीयर असतात .कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी पूर्ण करायची यावर ते संशोधन करत असतात .व त्यासाठी ते आपल्या स्वतःच्या मुलांवरही घरी प्रयोग करून पाहत असतात .खास वेगळा खर्च न करता व खास वेगळा वेळ न देता व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना या पद्धतीनेच शिकवल्या होत्या. त्यांच्या या शिक्षण पद्धतीचे अमेरिकेतही त्यावेळेला कौतुक झाले होते .सर्व कारखान्याची उत्पादन क्षमता आपण पंचवीस टक्के वाढवून दाखवू असे ते आत्मविश्वासाने सांगत आणि करूनही दाखवत .जगभरातून कारखानदार त्यांना त्यांच्या या कौशल्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत असत. कामगारांच्या काम करत असतानाच्या अनावश्यक हालचाली टाळून प्रत्येक काम झटपट कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ते निरीक्षण करून चलतचित्रे काढत आणि अनावश्यक हालचाली शोधत त्या अनावश्यक हालचाली टाळल्या की काम आपोआपच वेगात होत हाच त्यांचा सिद्धांत असतो.*
         *पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांना स्वतःची बारा मुले होती आणि या सर्वांना वाढवण्यासाठी त्यांनी घरांमध्ये लष्करी शिस्त लावली होती .ते ज्याप्रमाणे कारखान्यांमध्ये कमी वेळेत जास्त काम झाले पाहिजे तसेच घरामध्ये सुद्धा कमी वेळेत जो मुलगा पटकन सर्व कामे करेल त्याला बक्षीस ते देत असत. प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असलेच पाहिजे व काम करत असताना आपले बारीक लक्ष अगदी सेकंद काट्यावर ही असावे असा त्यांचा असा दंडक होता.घरामध्ये वेळेचा आणि हालचालींचा अपव्यय करणे म्हणजे गुन्हा समजण्यात येई. एवढ्या मुलांना सांभाळ तुम्हाला कसे शक्य होते ?असे जर कोणी त्यांना विचारले तर ते उपहासाने म्हणायचे की माझी बारा मुले असल्यामुळे मी कोणत्याही वस्तू डझनाने घेतो त्यामुळे आम्हाला स्वस्त मिळतात ,असे त्यांचे विनोदी उत्तर असायचे*
               *दर आठवड्याला ते कुटुंब सभेचे नियोजन करून आठवड्याची कामे वाटून देत असत त्यातूनच त्यांनी मुलांना त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण दिले होते या जर्मन व  फ्रेंच भाषेतील ग्रामोफोनच्या तबकड्या मुले आंघोळीला जात असताना त्यावेळी बाथरूममध्ये वाजवल्या जात असत, केवळ ऐकून ऐकून त्या मुलांनी जर्मन व फ्रेंच भाषा त्यामुळे अवगत केल्या होत्या .टंकलेखनाची ही त्यांनी स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या मुलांवर करुन कमी वेळेमध्ये टंकलेखन कसे करावे हे अमेरिकेत पटवून दिले होते. जास्त अभ्यास करून एखादा वर्ग गाळल्यास त्या मुलांना ते सायकलचे प्रलोभन दाखवत असत त्यामुळे सर्वजण बहीण आणि भाऊ  जास्तीत जास्त अभ्यास करून एखादा वर्ग कसा गाळला जाईल यासाठी प्रयत्न करत असत .बऱ्याच अवघड गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना अगदी कमी वेळेत घरीच शिकवल्या होत्या.पहिल्या महायुद्धात त्यांची कमीत कमी वेळात शस्त्र जोडणे सुट्टी करणे या कामी अमेरिकन लष्कराने मदत घेतली होती .वैद्यकशास्त्रात ही एखादे  ऑपरेशन  निम्मा वेळ वाचवून कसे करता येईल याचे संशोधन त्यांनी मांडले होते. त्यांना कुणीतरी एकदा व्याख्यानांमध्ये प्रश्न विचारलं होता- प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वाचलेल्या वेळात करायचं तरी काय ?? त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं, कलानिर्मिती करायची, मौज करायची  वेगळे छंद जोपासायचे, आयुष्य भरभरून जगायचं अस समर्पक उत्तर त्यांनी दिले होते.*   
          *पुढे त्यांची बारा ही मुले मोठी होऊन अमेरिकेत वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत ,त्याच बरोबर त्यांच्या या पुस्तकांवर सिनेमा सुद्धा काढला गेला. सिनेमाही खूप गाजला होता.मुलांचे मानसशास्त्र कसे असते आणि मुलांचा योग्य विकास कसा साधावा यासाठी प्रत्येक पालकांनी त्याचबरोबर शिक्षकांनी वाचावे असे हे सुंदर पुस्तक आहे . आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे सुंदर धडे या पुस्तकाच्या पानापानात शिकायला मिळतात.चरित्र म्हटल्यानंतर कितीतरी वेळा जीवनात संघर्ष मांडला जातो परंतु या पुस्तकामध्ये जरी संघर्ष असला तरी सुद्धा तो अतिशय विनोद बुद्धीने  मांडून त्याच्यावर मात करून  गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिकवण्याची धडपड या पुस्तकात प्रत्येक ठिकाणी व्यतीत होत असते.*

✒️✒️✒️ ✒️✒️✒️
*© विष्णू ढेबे- महाबळेश्वर*
📞📞-7588686065

www.vishnudhebe.blogspot.com

Tuesday 14 April 2020

🌦️🌧️⛈️ *कालच्या पावसाच्या निमित्ताने* 🌨️⛈️🌧️ -------

            पावसाळ्यातील अति पावसाने ,त्याच्या नको असलेल्या रिपरिपिने माणूस नक्कीच कंटाळतो ,पण तोच पाऊस जर उन्हाने काहिली होत असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरसला तर माणूस नक्कीच सुखावतो .माणसाच्या जीवनप्रवासातही काही असच आहे .........ह्या धावत्या जगामध्ये ,आशानिराशेच्या फेर्यांमध्ये उन्हाळ्यातील पावसा सारखे काही चार थेंब शिंपडले तर तो खूपच सुखावतो ,नाहीतर पावसाळ्यातील रिपरिपी सारखेच त्याला आयुष्य भासते .पावसाळ्यातला मान्सून सारीकडेच आपल्या मुक्तहस्तानी उधळण करत करत ,सार्यांना सुखावत पुढे पुढे प्रवास करत असतो .उन्हाळ्यात होणारे त्याचे शिडकावे मात्र काहींच्याच नशिबात .त्यातही एखादे पिक पिक जर कापणीला आलेले असेल तर बळीराजाच्या डोळ्यातून वाहणारे दुखाश्रू सार्यांच्या काळजाचा ठोका चुकवतात .तसा तो बाल्कनीत उभा राहून पाहायला लहान थोरांना आवडतो ,मात्र विजांच्या कडकडाटात गुरे चारणाऱ्या गुराख्याला ,परतीच्या वाटेवर चालत असताना मध्येच गाठून चिंब झालेल्या वाटसरुना त्याचे रौद्र रूप कुठपर्यंत धड्कतंय कि फिरतोय येथूनच माघारी असे अनेक प्रश्न मनात घोंघावतात ?सारेच प्रश्न अनाकलनीय ?.तसे अंदाज वर्तवले जातात त्याच्याबाबत वर्तमानपत्रातील कधीही न खरे ठरणाऱ्या राशीभविष्यासारखे .......तो असतोच साऱ्यांच्या  अंदाजाच्या पलीकडचा . कोणाला आवडतो त्याच्या पहिल्या मातीतला सुगंध....... ,तर तो आवडतो पानामधून निथळताना....... तर काहींना त्याच्या जलधारा सांडतात जेंव्हा उंचावरून........, तर काहींना त्याच्या मुळेच हिरव्यागार झालेल्या धरणी मातेच्या रुपात.......,तर काहीना आवडतो जेंव्हा तो दाखवतो सुवर्णरुपी इंद्रधानुष्यातून आपले ओजस्वी रूप ........... पण जेंव्हा तो खूप दिवसातून धरणीमातेची गळाभेट घेत असेल तेंव्हा आईच्या कुशीत मायेने काही क्षण विसावण्यासारखा  दुसरा आनंद त्याला वाटत नसेल ..........कारण त्याची सुरवातच या मातेच्या अंगाखांद्यावर झालेली असते .तिच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता तिला अलगद दूर सारून उंच गगनात जाण्याची त्याची महत्त्वकांक्षा त्याला कशी गप्प बसू देईल? खेळता खेळता सारे मोहपाश दूर झुगारून मातेला दूर सारून कधी तो उंच भरारी घेईल काही सांगता येत नाही .माणसाचेही काही तसेच आहे ना .......? मोठ्या महत्वकांक्षा मनाशी बाळगून ,सारे काही झुगारून तो हि जातो की खूप दूरच्या देशी . पण शेवटी ओढ असतेचना आपल्या माणसांची ......पावसालाही उंचावरून आपल्या मातेचे रूप पाहताना आठवण नक्की होत असेलचकी.त्याला गर्व होत असेलच मोठी उंची गाठल्याचा आणि भूमातेलाही अभिमान वाटत असेल त्या उंचीचा .पण हे उंचीचे अंतर फार काळ कुठे टिकते ? दोघानाही ओढ असतेच ना खूप दिवसांनी  परत......... भेटण्याची .अशावेळी त्याच्या प्रवासात अडथळे येतातच त्याच्याच उंचीच्या गिरीशिखरांचे जे करत असतात त्याच वेळी ...........आकाशाशी स्पर्धा .,आणि तो पुन्हा माघार घेवून आतुर होतो असेल पुन्हा यथेच्छ खेळण्यासाठी आपल्या मातीत .......आपणही होत असतो आतुर सारे त्याच्या भेटीला बरोबर् ना????  कधी वेळेत तर कधी वाट पाहत ठेवणारी भेट असते ती  फार पूर्वापार चालू असलेली ही विलोभनीय गळाभेट.....कधी होते अगदी वेळेत तर कधी कधी वाट पाहायला लावणारी.....पण ती वेळेत होत नाही यास कारणीभूत कोण ?त्याच्या पूर्वापार चाललेल्या या जीवनप्रवासात आपण सारेच काटे पसरत असतो .आपल्यातील काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो . स्वतःचा विकास म्हणजे गर्द हिरवाई छाटून तेथे स्वतःच्या अहंकाराचे पांढरेशुभ्र सिमेंट काँक्रीटचे कृत्रिम जंगल वसवण्यात तो अगदी गुरफटलेला असतो.... काहीजण तर तो विकास नावाचा अजब गजब ,साऱ्यांना मोहित करणारा पण मृगजळाप्रमाणे कधीही न सापडणारा मोह राक्षस शोधण्यात आपल्याला कृतकृत मानत असतात.पण ही भूमाता किती सोसणार हे सारे काही......? आपले किती स्वार्थी हट्ट किती दिवस ती पुरवणार..... ?ज्याप्रमाणे कुर्हाडीचा दांडा गोतास काळअसे म्हणले जाते तसेच काहीसे चालू आहेना सध्या या पृथ्वीतलावर....? . ज्या मानवजातीने धारणीमतेच्या अंगाखांद्यावर चांगले दिवस काढले त्यांची पुढची पिढी मात्र तिच्याच मुळावर उठली आहे ...........? भूमातेच्या कवच कुंडल्रे हिरवी वस्त्रे हरण करण्याचाच हा प्रकार आहे ना........? जिच्या जीवावर हिं मानवजात मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहत आहे तिला काही काल आपले पाय मातीतच घट्ट रोवण्यसाठी तर ही भूमातेने लढवलेली ही शक्कल तर नसावी .....….? काहींही म्हणा पण तिने आपल्या स्वार्थी  लेकरांना  जमिनीवर आणले आहे हे मात्र नक्की . दोन तीन दिवसापासूनचा चंद्र आपण बघितला असेल किती मोहक ..?,किती मोठा...? ,किती स्पष्ट ....? समुद्रकिनारे ,नदीकिनारे स्वच्छ झालेले आहेत ,दूरची पर्वत शिखरे जवळ भासू लागली आहेत .ऐन उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ गारवा जाणवत आहे .अहो आपल्या आसपास चिमण्या चिवचिवाट करू लागल्या आहेत .पुन्हा एकदा धरणीमाता आपल्या साऱ्या पापांना पोटात घालून सज्ज होत तर नसेल ना ........? पुन्हा एका अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी....?मानवाला ही थोडे याबाबत चिंतन   ,मनन ,पश्चात्ताप होण्यासाठी आपल्याच घरी काही दिवस  ठेवले नसेल ना बंदिवासात .......? काही काळ घेतलेला हा अर्धविराम या अनाकलनीय प्रवासात सिंहावलोकन करण्यासारखा आहे एवढे मात्र नक्की .होत आहे थोडासा त्रास पण आपण जसे आपल्या मुलांसाठी भविष्याचा विचार करून आपल्या पोटाला चिमटे घेतो तसे आपल्या साऱ्या मानवजातीच्या उज्वल भविष्यासाठी काही दिवस आपल्याच घरात आपल्याच प्रियजनांबरोबर एकत्र राहायला ........?
    गेले दोन दिवस दुपार नंतर होत असलेला  पावसाचा शिंतोडा,जो साधारण मे महिन्यात होतो तो अगदी चक्क एक महिना अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यात होतोय.....यावरून यावेळी पाऊस जो जुलेकडे जाऊन पोहचला आहे तो सुरु होईल का खूप वर्षांनी जून मध्ये .........?????? माझ्या मनाला पडलेला एक प्रश्न.*

© विष्णू ढेबे,महाबळेश्वर -7588686065

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...