Tuesday 21 April 2020

📕📗📘📙📒📔📗📕
         *पुस्तक परिचय*
*पुस्तकाचे नाव- चीपर बाय दी डझन*
लेखक- फ्रँक गिलब्रेथ(ज्युनियर) व अर्ने स्टाईन कॅरे
अनुवाद - मंगला निगुडकर
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या- १४४
किंमत- १०० रुपये
📓📔📒📙📘📗📕📒

          *चीपर बाय दी डझन हे पुस्तक फ्रॅंक गिलब्रेथ व अर्ने स्टाईन या एका मुलाने व मुलीने मिळून लिहिलेले आपल्या वडिलांचे चरित्रवजा पुस्तक असले तरी मनोवेधक व मनोरंजक आहे ,जे पूर्ण केल्याशिवाय आपण खाली ठेवत नाही. आपल्या वडिलांच्या लहानपणीच्या आठवणी मुलांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत .फ्रँक गिलबर्ट हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीयर असतात .कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी पूर्ण करायची यावर ते संशोधन करत असतात .व त्यासाठी ते आपल्या स्वतःच्या मुलांवरही घरी प्रयोग करून पाहत असतात .खास वेगळा खर्च न करता व खास वेगळा वेळ न देता व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना या पद्धतीनेच शिकवल्या होत्या. त्यांच्या या शिक्षण पद्धतीचे अमेरिकेतही त्यावेळेला कौतुक झाले होते .सर्व कारखान्याची उत्पादन क्षमता आपण पंचवीस टक्के वाढवून दाखवू असे ते आत्मविश्वासाने सांगत आणि करूनही दाखवत .जगभरातून कारखानदार त्यांना त्यांच्या या कौशल्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत असत. कामगारांच्या काम करत असतानाच्या अनावश्यक हालचाली टाळून प्रत्येक काम झटपट कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ते निरीक्षण करून चलतचित्रे काढत आणि अनावश्यक हालचाली शोधत त्या अनावश्यक हालचाली टाळल्या की काम आपोआपच वेगात होत हाच त्यांचा सिद्धांत असतो.*
         *पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांना स्वतःची बारा मुले होती आणि या सर्वांना वाढवण्यासाठी त्यांनी घरांमध्ये लष्करी शिस्त लावली होती .ते ज्याप्रमाणे कारखान्यांमध्ये कमी वेळेत जास्त काम झाले पाहिजे तसेच घरामध्ये सुद्धा कमी वेळेत जो मुलगा पटकन सर्व कामे करेल त्याला बक्षीस ते देत असत. प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असलेच पाहिजे व काम करत असताना आपले बारीक लक्ष अगदी सेकंद काट्यावर ही असावे असा त्यांचा असा दंडक होता.घरामध्ये वेळेचा आणि हालचालींचा अपव्यय करणे म्हणजे गुन्हा समजण्यात येई. एवढ्या मुलांना सांभाळ तुम्हाला कसे शक्य होते ?असे जर कोणी त्यांना विचारले तर ते उपहासाने म्हणायचे की माझी बारा मुले असल्यामुळे मी कोणत्याही वस्तू डझनाने घेतो त्यामुळे आम्हाला स्वस्त मिळतात ,असे त्यांचे विनोदी उत्तर असायचे*
               *दर आठवड्याला ते कुटुंब सभेचे नियोजन करून आठवड्याची कामे वाटून देत असत त्यातूनच त्यांनी मुलांना त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण दिले होते या जर्मन व  फ्रेंच भाषेतील ग्रामोफोनच्या तबकड्या मुले आंघोळीला जात असताना त्यावेळी बाथरूममध्ये वाजवल्या जात असत, केवळ ऐकून ऐकून त्या मुलांनी जर्मन व फ्रेंच भाषा त्यामुळे अवगत केल्या होत्या .टंकलेखनाची ही त्यांनी स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या मुलांवर करुन कमी वेळेमध्ये टंकलेखन कसे करावे हे अमेरिकेत पटवून दिले होते. जास्त अभ्यास करून एखादा वर्ग गाळल्यास त्या मुलांना ते सायकलचे प्रलोभन दाखवत असत त्यामुळे सर्वजण बहीण आणि भाऊ  जास्तीत जास्त अभ्यास करून एखादा वर्ग कसा गाळला जाईल यासाठी प्रयत्न करत असत .बऱ्याच अवघड गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना अगदी कमी वेळेत घरीच शिकवल्या होत्या.पहिल्या महायुद्धात त्यांची कमीत कमी वेळात शस्त्र जोडणे सुट्टी करणे या कामी अमेरिकन लष्कराने मदत घेतली होती .वैद्यकशास्त्रात ही एखादे  ऑपरेशन  निम्मा वेळ वाचवून कसे करता येईल याचे संशोधन त्यांनी मांडले होते. त्यांना कुणीतरी एकदा व्याख्यानांमध्ये प्रश्न विचारलं होता- प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वाचलेल्या वेळात करायचं तरी काय ?? त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं, कलानिर्मिती करायची, मौज करायची  वेगळे छंद जोपासायचे, आयुष्य भरभरून जगायचं अस समर्पक उत्तर त्यांनी दिले होते.*   
          *पुढे त्यांची बारा ही मुले मोठी होऊन अमेरिकेत वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत ,त्याच बरोबर त्यांच्या या पुस्तकांवर सिनेमा सुद्धा काढला गेला. सिनेमाही खूप गाजला होता.मुलांचे मानसशास्त्र कसे असते आणि मुलांचा योग्य विकास कसा साधावा यासाठी प्रत्येक पालकांनी त्याचबरोबर शिक्षकांनी वाचावे असे हे सुंदर पुस्तक आहे . आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे सुंदर धडे या पुस्तकाच्या पानापानात शिकायला मिळतात.चरित्र म्हटल्यानंतर कितीतरी वेळा जीवनात संघर्ष मांडला जातो परंतु या पुस्तकामध्ये जरी संघर्ष असला तरी सुद्धा तो अतिशय विनोद बुद्धीने  मांडून त्याच्यावर मात करून  गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिकवण्याची धडपड या पुस्तकात प्रत्येक ठिकाणी व्यतीत होत असते.*

✒️✒️✒️ ✒️✒️✒️
*© विष्णू ढेबे- महाबळेश्वर*
📞📞-7588686065

www.vishnudhebe.blogspot.com

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...